----विनय जोशी
खालील चित्रातील सनातनच्या साधिकेला आलेले अनुभव आधी वाचु आणि मग यामागची मानसिकता समजुन घेण्याचा प्रयत्न करू...
"दैनिक सनातन प्रभातने देहावरील आवरण काढल्याने झालेले लाभ
‘काही दिवसांपूर्वी मला पुष्कळ आध्यात्मिक त्रास होत होता. मला ‘माझा तोंडवळा, डोके आणि कान यांवर पुष्कळ आवरण आले आहे’, असे जाणवत होते. मला काही सुचत नव्हते. नामजप करतांना मन एकाग्र होत नव्हते. पुष्कळ जडपणा जाणवायचा. देवानेच मला दैनिक सनातन प्रभातने आवरण काढण्याचे सुचवले. मी तसे आवरण काढू लागल्यावर मला पुष्कळ जांभया येऊन हलकेपणा जाणवू लागला."
वरील लिखाण दादा कोंडकेंच्या सिनेमातील द्वैयर्थी डायलॉग ची आठवण करून देतं. दादा कोंडकेचं पाकीट बाजारात मारलं गेल्यावर दादा म्हणतो, "एय... माझं बाकी काय पन मार, पन पाकीट मारू नको!" वरील तथाकथित अनुभव कथनात बातमीचं शीर्षक एक भयंकर अर्थ पोचवत आहे आणि खालील वर्णन त्याला पुरक संदेश देतोय...
सनातनचे साधक ज्या पराकोटीच्या अगम्य आणि भावनिक भाषेत सगळ्यांजवळ बोलतात आणि लिहितात त्याला अनेक व्यावहारिक आणि शास्त्रीय कारणे आहेत. त्यांची भाषा आणि त्यातील विसंगत, अशास्त्रीय, तर्कहीन, आचरट गोष्टी आणि दावे ऐकून अनेक जण यथेच्च टिंगल करतात. पण हा एक सामुहीक आजार आहे. आणि त्याला अनेक कंगोरे आहेत. या साधकांच्या मानसिक स्थितीचा आपण सहानुभुतीने विचार केला पाहिजे. तुम्ही या मताशी सहमत असलंच पाहिजे अशी अट नाही पण वाचुन बघु शकता...
साधारणपणे दिवसभराची धावपळ झालेला माणुस दमुन भागुन घरी परत येतो त्यावेळी लहान सहान गोष्टींवरून तो चिडचिड करतो. दिवसभराच्या कष्टांनी शरीरातली उर्जा संपत आलेली असते आणि मन थकलेलं असतं. अशावेळी त्या माणसाची सगळ्या जगाबद्दल तक्रार असते. प्रत्येकाच्या बाबतीत रोज असे काही क्षण येत असतात; पण काहींच्या आयुष्यात दिवसाचा प्रत्येक क्षण हा निराशाजनक आणि दिशाहीन असतो, असं का असतं?
असं असण्यामागे अनेक कारणे आहेत. अनेक आजारांनी त्रासलेलं शरीर, अस्थिर कौटुंबिक वातावरण, लैंगिक, शारीरिक सुखांची/भावनांची पुर्तता नं होणे, आर्थिक अडचणी, कौटुंबिक कलह, व्यावसायिक आणि आर्थिक उद्दिष्ट साध्य नं होणं, कोणतेही विशेष गुण अंगात नसल्याने समाजात किंमत नसल्याची मानसिकता, काहीतरी वेगळं करून लोकांचे लक्ष आकर्षित करण्याची भुक, अनेक दिवस चांगली झोप नं झाल्याने भ्रमिष्ट झालेले मन, सांधेदुखी सारखे कधीही बरे नं होणारे किचकट, बोचरे आजार, रक्तामधील सोडीयमचं प्रमाण सतत कमी असणं (Hyponatremia) वगैरे वगैरे...
आपल्या माहितीत असलेल्या सनातनच्या साधकाचं वरील निकषांवर विश्लेषण केल्यास यातील तथ्य समोर येईल.
कुठल्याही समाजात अशा आणि अन्य अनेक प्रकारच्या समस्या प्रचंड प्रमाणात असतात. त्यामुळे अशी माणसे त्यातुन बाहेर पडण्याचा राजमार्ग शोधत असतात. नेमक्या त्याच वेळी सनातन सारखे; व्यावहारिक अडचणींना तथाकथित राष्ट्रीय, आध्यात्मिक, आक्रमक विचारांचं कोंदण देणारे सापडले की वर वर्णन केलेल्या प्रकारातले सर्व मानसिक, व्यावहारिक, शारीरिक रोगी तिकडे आकर्षित होतात. आणि शीर्षस्थ लोक; जे प्रचंड धुर्त आणि स्वार्थी असतात ते याचं "मानसिक" शोषण करून त्यांना वाटेल त्या दिशेला अलगदपणे वळवतात.
पाश्चात्य देशात अशा चमत्कारिक पंथांच्या (मिस्टिक सेक्टस) नादाला लागुन एकाच ठिकाणी जमुन अनेकांनी सामुहीक आत्महत्या केल्याची उदाहरणे चिक्कार घडली आहेत. नुकतीच दिल्ली जवळ बुराडी येथे अशीच एका कुटुंबाने आत्महत्या केली. जे आत्महत्या करू शकत नाहीत आणि ज्यांना सनातन सारखा आपल्या दबलेल्या आकांक्षांना वाट मोकळी करून देणारा एक "व्हॉल्व" उपलब्ध होत नाही ते अमेरिकेत बंदुक विकत घेऊन मॉल/रस्ता/शाळा अशा ठिकाणी जाऊन गोळीबार करून पळतात किंवा आत्महत्या करतात.
सनातन सारख्या व्यवस्था कदाचित अमेरिकेत निर्माण झाल्या तर अशी सामुहीक हत्याकांडे थांबवु शकतील, कारण त्यांना व्यक्त व्हायला एक हक्काचं व्यासपीठ मिळेल (ह्या दाव्यावर मोठा वाद होऊ शकतो)!
लैंगिक गरजांची योग्य मार्गाने पूर्तता नं होणं ही भारतीय समाजात आढळणारी अजुन एक मोठी; (कदाचित) सर्वात मोठी समस्या आहे. याचा लग्न होणे किंवा नं होणे याच्याशी काहीही संबंध नाही. वरील उदाहरण अशाच प्रकारचे आहे अशी शक्यता वाटते. भारतीय समाजात लैंगिक संबंधांना एका किळसवाण्या नजरेतुन बघितलं जातं आणि पाश्चात्य जगात त्याला नको तितकं मोकळं रूप दिलं जातं. याचा सुवर्णमध्य गाठला गेला तर सनातन सारख्या संस्थांची अर्धी भरती बंद होईल अशी पक्की खात्री वाटते.
दुर्दैवाने बाहेर आध्यात्माचे कवच लाऊन अशा लैंगिक गरजांची कोंडी झालेल्यांवर ताव मारायला अनेक बंगाली बाबा- रहीम बाबा टपलेले आहेतच. अशा कुंठीत लोकांच्या गरजा भागवुन त्याला सतत अतर्क्य विश्वात रममाण ठेवलं की एकीकडून गरजाही भागतात आणि दुसरीकडून त्याचा बभ्रा होण्याची भीती नाही असा दुहेरी फायदा यात आहे.
सनातन मध्ये "लैंगिक शोषण" झाल्याची एकही तक्रार बाहेर आलेली नाही, पण ज्या पद्धतीने आश्रम नावाचे "घेट्टो" सनातनने उभे केले आहेत आणि ज्या पातळीचे मानसिक भ्रम असलेले लोक तिथे राहतात त्यावरून कसलीही शक्यता नाकारता येत नाही.
सनातनची सुरुवात "दुर्जनांच्या नाशासाठी" या घोषणेने झाली आणि पुढे ती "हिंदुराष्ट्राची स्थापना" इथपर्यंत पोचली. पहिल्या घोषणेत "महम्मद पैगंबर',"येशू ख्रिस्त" वगैरे उच्चकोटीचे धर्मात्मे होते, परंतु या घोषणेला पब्लिक अपील मिळत नसेल म्हणा किंवा "हिंदुत्व"एक चलनी नाणं आहे हे निष्णात "मानसोपचार तज्ञ" असलेल्या सनातनच्या संस्थापकांना लक्षात आलं असेल म्हणा त्यांनी दुसऱ्या घोषणेच्या आधारे सनातन मोठ्या पल्ल्यावर पोचवली... त्यामुळे आता ती तिसऱ्या आणि सर्वात आकर्षक घोषणेच्या तयारीला लागु शकते...
सनातनची तिसरी घोषणा काय असू शकते?
ओशो रजनीश यांनी "संभोग ते समाधी" अशी घोषणा दिली, याचा अर्थ जीवनाच्या निर्माणासाठी लागणाऱ्या कृतीपासून ते शेवटची स्थिती समाधी पर्यंत. पण त्यांच्या धुर्त अनुयायांनी "संभोग ते समाधी" याचा अर्थ "संभोगातुन समाधीकडे" असा लाऊन घेतला आणि त्याला "सेक्स ऑर्जी" चं स्वरूप दिलं.
येणाऱ्या काळात हिंदुत्वाचा राजकीय वापर कमी होऊन तो "विकास, विकास और विकास" असा झाल्यास सनातन शुद्ध भौतिक घोषणा देईल आणि ती "संभोगाद्वारे समाधी" या घोषणेशी मिळती जुळती असेल.... आणि कॅथोलिक चर्चसारख्या "मॅग्दालीन लाउंड्रीज" इथेही बनलेल्या दिसतील...
म्हणुन सनातनकडे एक "सामाजिक आजार" म्हणुन दयाळु नजरेने बघुया, त्यात फसलेल्या बंधु-भगिनींना योग्य वैद्यकीय उपचार मिळतील असं बघुया आणि खऱ्या हिंदुत्वाची सेवा करून "हिंदु राष्ट्राचं" स्वप्न साकार करायला हातभार लाऊया...