Wednesday, August 29, 2018

सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती? शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!


Image may contain: one or more people and glasses

सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती?
शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!

---- विनय जोशी
सनातनवरील बंदीला तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम यांचाच विरोध होता! १ डिसेंबर २०१५ ला लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे तावातावाने मोदी सरकारला जाब विचारात होत्या की तुम्ही सनातनवर बंदी का घालत नाही? त्यावर मंत्री किरेन रिजीजु यांनी त्यांना उत्तर दिलं की सनातनवर बंदी घालण्याएवढे पुरावे सरकारकडे नाहीत आणि बंदी कोर्टात टिकणार नाही, असं तत्कालीन गृहमंत्री चिदंबरम याचं मत होतं!
मुख्य प्रश्न आहे, की कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस सनातनवर बंदीच्या विरोधात का होते?
महाराष्ट्रात सनातनने अतिशय वेगाने आपला पसारा वाढवला. संघ आणि संबंधित हिंदु संघटना ज्या समाजघटकात ५० वर्षात पोचु शकल्या नाहीत त्यात सनातन फक्त ५ वर्षात पोचली. खेड्यापाड्यात आक्रमक हिंदुत्व मांडणारे हिंदु मेळावे सुरु झाले. संघाची हिंदुत्वावरील मक्तेदारी मोडणारी एक शक्ति उदयाला येतेली बघुन महाराष्ट्रातल्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी सरकारने सनातनाकडे काणाडोळा केला. त्याची परतफेड म्हणुन सनातन त्यांच्या वृत्तपत्रात संघाला, सरसंघचालकांना तिरकस आणि जोरकस प्रश्न विचारू लागली, "हेच का तुमचे हिंदुत्व", "ह्यालाच हिंदुराष्ट्रवाद म्हणतात?" वगैरे. कॉंग्रेस सरकारमधील राष्ट्रवादीचे गृहमंत्री आबा पाटील यांनी सनातनवरील बंदीच्या मागणीकडे साफ साफ दुर्लक्ष केलं असा आरोप अनिसचे श्याम मानव यांनी केला आणि वर हेही सांगितलं की आबांनी दुर्लक्ष केल्यामुळे मी शरद पवारांकडे गेलो आणि त्यांनी बंदीच्या प्रस्तावाला समर्थन दिलं!
या सरकारने बंदीचा प्रस्ताव त्यांच्याच केंद्र सरकारला पाठवला पण एकुणच ही "नूरा कुश्ती" म्हणजे खोटी कुस्ती होती त्यामुळे केंद्र सरकारने प्रस्ताव फेटाळला. ठाण्यात सुतळी बॉम्बच्या स्फोटात सनातनचे काही लोक पकडले जाऊनही बंदीचा प्रस्ताव फेटाळला गेला हे आणखी एक नवल!
सनातनचा कॉंग्रेसला उपयोग काय?
शिवसेना जेव्हा अतिशय नवीन होती तेव्हा कॉंग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी- वसंतरावांनी कम्युनिस्टांची ट्रेड युनियन मधील दादागिरी मोडुन काढण्यासाठी शिवसेनेला बळ दिलं. त्यामुळे शिवसेनेला गंमतीने "वसंतसेना" म्हणायचे! हाच प्रयोग संघाला शह देण्यासाठी महाराष्ट्र सरकार सनातनच्या बाबतीत करत होते.
आबा पाटील पक्षशिस्त मानणारे नेते होते, शरद पवारांना फाट्यावर मारण्याची त्यांची इच्छा कधीच नव्हती, त्यामुळे श्याम मानव म्हणतात तसं आबांनी सनातन बंदीचा प्रस्ताव फेटाळला तो पवारांच्या हुकुमावरूनच आणि नंतर पवारांनी स्विकारला तो धोरण म्हणुनच. पण वास्तवात सनातनवर बंदी घालुन कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सनातनच्या प्रचंड मोठ्या साधक वर्गाला दुखावण्याची अजिबात इच्छा नव्हती.
जर सनातन आहे तशीच झपाट्याने वाढत राहिली संघाचा "हिंदुत्व" जनाधार घसरेल आणि परिणामी भाजपचा प्रसार कमी होईल अशी भोळी आशा मनात होती. पण ती फोल ठरली.
मग सनातन घातपातात सामिल आहे अशा बातम्या पुढे येऊ लागल्या तेव्हा त्याला "हिंदु आतंकवाद" नावाच्या नव्या लेबलखाली संघाशी जोडुन सगळ्यांना एकत्र बदनाम करता येईल या हिशेबाने कॉंग्रेस साठी सनातनची उपयोगिता वाढली. पण लोक संघ-सनातनला एका मापात मोजायला तयार होईनात.
मग सनातनचे संस्थापक डॉ. आठवले ब्राह्मण आहेत (अनुयायी बहुसंख्य बहुजन असले तरीही!) त्यामुळे सनातनला "ब्राह्मणी कावा", "मनुवादी" यांच्याशी जोडणं सोपं जाईल म्हणुन ती सगळ्यांच्याच सोयीची "पंचिंग बॅग" झाली.
पण यातला एकही प्रकार कॉंग्रेसच्या निर्णायक आणि निखळ फायद्याचा ठरेना, त्यामुळे आता सगळं घोंगडंं भाजप सरकारच्या गळ्यात घालून दोघेही मोकळे झाले!
संघ-भाजप यांच्या हिंदुत्वाची सगळ्यात अर्वाच्य भाषेत हेटाळणी सनातने केली आहे. संघ प्रमुख मोहनराव भागवतांवर सर्वात खालच्या पातळीवरून टीका सनातनने केली आहे. आणि तरीही राजकीय फायद्यासाठी सनातन-संघ यांना एकाच मापाने मोजण्याचे प्रकार बिनदिक्कत चालु आहेत.
काल पकडलेले लोक खरंच गुन्हेगार आहेत का? ते सनातन ते खरंच साधक आहेत का? ते खरंच धर्माच्या नावाखाली हिंसाचार करणार होते का? या प्रश्नांची उत्तरे गुलदस्त्यात आहेत.
पण..... एक गोष्ट नक्की आहे, राजकीय फायद्यासाठी आणि नेहरू-इंदिरा गांधी- सोनिया गांधी यांनी आपट-आपट-आपटून जो संघ संपला नाही तो सनातनच्या उग्र हिंदुत्वाच्या काठीने संपवण्याचा आणि वसंतसेनेच्या माध्यमातुन अजुन एक नवीन शिवसेना स्थापुन संघाला "काऊंंटर बॅलन्सिंग फोर्स" तयार करण्याचा मोठा प्लान मात्र सपशेल तोंडावर आपटला आहे!
No automatic alt text available.

ज्ञान प्रबोधिनी- संघ परस्पर संबंध, सनातनच्या पार्श्वभूमीवर

ज्ञान प्रबोधिनी- संघ परस्पर संबंध, सनातनच्या पार्श्वभूमीवर
--- विनय जोशी 

स्वातंत्र्याच्या नंतर लगेचंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन उमदे, बुद्धिमान प्रचारक श्री. आप्पासाहेब पेंडसे आणि श्री. मधुकरराव देवल संघाची वाट सोडुन वेगळ्या वाटेवर निघाले. तत्कालीन संघप्रमुख श्री. गोळवलकर गुरुजी यांच्याशी त्यांचे संघाची कार्यपद्धती आणि समाजसेवा यासंदर्भात सैद्धांतिक मतभेद होते असं म्हणायला भरपूर जागा आहे.

पुढे श्री.आप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्याला ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली आणि श्री. मधुकरराव देवल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या आपल्या मूळ गावी जाऊन 'एकात्म समाज केंद्रा’ च्या माध्यमातुन दलित समाजाच्या उत्थानाचे काम करू लागले.

बघता बघता ज्ञान प्रबोधिनीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. वेगवेगळे अभिनव उपक्रम, शाळा, कौशल्य विकास आणि थोडक्यात म्हणजे विद्यार्थ्यांना जन्मभर पुरतील असे संस्कार देणारी एक सक्षम व्यवस्था निर्माण केली. अत्यंत सकारात्मक विचार करणारी, एकसो एक विद्वान, बुद्धिमान, ध्येयनिष्ठ हजारो- लाखो माणसे प्रबोधिनीने समाजात शब्दशः ओतली. महाराष्ट्रात सध्या आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या लाटेमध्ये प्रबोधिनीची भुमिका महत्वाची आहे. सध्याही तिथे या संदर्भातील उपक्रम चालत असतात.

एकंच काम डोळ्यासमोर ठेऊन, जन्मभर त्यात स्वतःला झोकुन देऊन त्या कामात सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे अनेक जण यातुन बाहेर पडले आहेत. आपण केलेल्या कामाचा अजिबात गवगवा, मार्केटिंग, श्रेयवाद नं लाटता, सतत ठरलेल्या वाटेवर चालणारे लोक प्रबोधिनीने समाजाला दिले आहेत. त्यांनी केलेली कामे सर्वोच्च दर्जाचीच असणार आणि त्या त्या क्षेत्रात ती सर्वात उंचावरच असणार याबाबत प्रबोधिनीच्या बाहेरील लोकांनाही पुर्ण खात्री आहे, हेच प्रबोधिनीचं सगळ्यात मोठं यश आहे.

प्रबोधिनीने उपलब्ध कार्यकर्ते आणि संसाधने यांची योग्य सांगड घालुन कामे उभी केली आहेत. अंथरूण पाहुन पाय पसरल्यामुळे अनियंत्रित, असंबंध फाफट पसारा त्यांनी वाढवला नाही आणि त्याच्या दर्जाशी जराही तडजोड केली नाही. संघातुन बाहेर पडलेले आप्पासाहेब यांनी स्थापन केलेली असली तरी त्यांनी स्वतः संघाचा कधीही द्वेष केला नाही, त्यामुळेच तो प्रबोधिनीच्या मानसिकतेत कुणालाही शिवला नाही. त्याशिवाय संघाजवळ स्पर्धा करण्याची ईर्षा त्यांच्या मनाला शिवली नाही, त्यामुळे त्यांच्या मनात समाजसेवा म्हणुन जो काही विचार होता, तो त्यांनी अपार कष्ट करून जमिनीवर आणला आणि संघ ज्या क्षेत्रात काम करत नव्हता त्यात त्यांनी मुसंडी मारून एक "बेंचमार्क" तयार केला.

ज्यातुन ते बाहेर पडले त्या संघाशी काही ना काही मतभेद असणं स्वाभाविक आहे पण ते कधीही कटुतेमध्ये परिवर्तीत झाले नाहीत. संघ "क्वान्टीटी" च्या मागे लागुन "क्वालिटी" मध्ये तडजोड करतो असा प्रबोधीनितल्या बऱ्याच जणांचा आक्षेप आहे (ह्याला सकारात्मक टीका म्हणतात). काही अंशी तो बरोबरही असू शकतो.

आपण कोणीतरी आहोत हे दाखवण्यासाठी दुसरा वाईट आहे, हे दाखवण्याची प्रबोधिनीला कधीही गरज भासली नाही.

दुसरे श्री. मधुकरराव देवल, जे आप्पासाहेब पेंडसे यांच्यासारखेच संघ प्रचारक होते. त्यांनी आपल्या म्हैसाळ या मूळ गावी जाऊन दलित समाजाच्या विकासासाठी प्रचंड धडपड करून दलित बांधवांचा मोठा विश्वास मिळवला. 'एकात्म समाज केंद्रा’ या नावाने सुरु केलेल्या या कामाने त्यांनी जादु घडवली. त्यांच्या कार्यावर वसंत देशपांडे यांनी १९८४ साली 'म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग'. हे पुस्तक लिहिलं. त्याला नाटककार विजय तेंडुलकर (हातात पिस्तुल मिळालं तर पहिली गोळी मोदीला मारीन म्हणणारे ते हेच!!!) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात देवलांच्या कामाचा आणि त्यांच्या कामामुळे दलित समाजाच्या वाढलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तराचा विस्तृत अहवाल दिला आहे. देवलांनी स्थापन केलेली "श्रीविठ्ठल सहकारी शेती सोसायटी" ही खरोखर दलितांनी-दलितांसाठी चालवलेली संस्था आहे आणि या संस्थेने गावकऱ्यांचा आर्थिक उद्धार झाला. देवलांच्या कामाची पु.ल. देशपांडे यांनीही खूप स्तुती केली आहे.

अशा, म्हणजे संघापासून फारकत घेऊन काम करणाऱ्या मधुकरराव देवल यांच्याशी संघ कसा वागला? संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना पुढे लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला. बाळासाहेबांनी पुरस्काराची सर्व रक्कम श्री. मधुकरराव देवलांच्या म्हैसाळ प्रकल्पाला देऊन टाकली. कोत्या मनोवृत्तीची संघटना अशी वागेल?

ज्ञान प्रबोधिनी आसामच्या आसपास अनेक शैक्षणिक प्रयोग करत असते. स्थानिक संघ प्रचारक जेव्हा आणि जशी गरज पडेल तेव्हा आणि तशी मदत त्यांच्या कामात करत असतात. प्रबोधिनीच्या कामाचा संघाच्या कामाला अप्रत्यक्ष उपयोग होतंच असतो. पण संघ आणि प्रबोधिनी यांना कोणत्याही प्रकारची स्पर्धा एकमेकांशी करण्यात रस नसल्याने ज्याला, जिथे, जेव्हा मदत लागेल तेव्हा तो ती मागतो आणि दुसरा निसंकोचपणे ती देतो.

प्रबोधिनी अत्यंत सकारात्मक विचार रुजवण्याच्या नादात स्वप्नाळु, समाजात चालणाऱ्या वास्तविक व्यवहारांच्या बाबतीत पुर्णपणे अनभिज्ञ पिढी घडवते असा काही संघवाले आक्षेप घेतात (सकारात्मक टीका अशी केली जाते!!!). पण हा आक्षेप आत्यंतिक विषारी दिशेने कधीही जात नाही.

निष्कर्ष:-
संघ सैद्धांतिक मतभेद सैद्धांतिक पातळीवरून हाताळतो (समोर परिपक्व लोक असतील तर!!!), त्याला विरोधासाठी विरोध आणि विषारी अपप्रचाराच्या पातळीवर जाऊ देत नाही, कारण असले धंदे करायला कुणालाच रिकामा वेळ नसतो.

मागील तीन लेखात "सनातन" संघाविरोधात सोंगटी म्हणुन कशी वापरली गेली आणि 'सकारात्मक टीका' अशा गोड लेबलखाली सनातनच्या प्रकाशनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांवर किती गलिच्छ आणि खोटेनाटे आरोप केले त्याचा आढावा आपण घेतला. २००६ ला श्री. गुरुजी जन्मशताब्दी निमित्त संघाने देशभर हिंदु संमेलने घेतली त्यांनतर सनातनने तशीच हिंदु संमेलने गावोगाव घेतली (याबद्दल सनातनचे आभार). आणि नंतर कोणीतरी अज्ञातपणे चावी फिरवल्यावर सनातनचा संघाविरोधात अतिशय विषारी, द्वेषपूर्ण प्रचार सुरु झाला.

संघविरोधी घाणेरड्या प्रचारानंतर लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिली की "सकारात्मक टीकेची" ढाल वापरायची आणि प्रत्यक्षात चारित्र्यहनन करायचं ही सनातनची जुनी सवय आहे. ती यापुढे कायमची बंद होईल अशी आशा आहे!

मागील तीन आणि हा चौथा लेख यानंतर "सनातन" ला "सकारात्मक टिके" चा अर्थ कळला असेल अशी अपेक्षा बाळगुया आणि नवीन लेख लिहायची गरज भासणार नाही अशीही खात्री ठेवुया!




Add to Google