Tuesday, September 11, 2018

९/११ हल्ले आणि अमेरिका- पाकिस्तानचं अफगाणिस्तान धोरण

९/११ हल्ले आणि अमेरिका- पाकिस्तानचं अफगाणिस्तान धोरण 
Directorate S- Steve Coll

---- विनय जोशी 

पुस्तक परिचय- डायरेक्टोरेट एस- द सी.आय.ए. अँड अमेरिकाज सीक्रेट वॉर्स इन अफगाणिस्तान अँड पाकिस्तान 
लेखक- स्टिव्ह कोल 

पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय.ची विशेष आणि अत्यंत गुप्त ब्रँच "डायरेक्टोरेट एस" अफगाणिस्तानात तालिबानला सैनिकी आणि अन्य प्रकारचं प्रशिक्षण देण्यासाठी तयार केलेली होती. आणि त्याच तालिबानविरुद्ध अमेरिकन्स त्याच पाकिस्तानच्या तथाकथित मदतीच्या जोरावर लढत होतं! हाच डबल गेम हल्ली हल्ली अमेरिकन अध्यक्ष ट्रंम्प यांनी पहिल्यांदा जाहीरपणे उच्चरला आणि त्यांचं सुप्रसिद्ध "लाईज अँड डीसीट" वालं ट्विट वर्षाच्या सुरुवातीला केलं!

अमेरिका आणि सी.आय.ए. म्हटल्यावर  डोळ्यासमोर एक प्रतिमा असते टी म्हणजे एक शिस्तबद्ध देश आणि त्या देशाची अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने काम करणारी महाशक्तिशाली गुप्तचर संस्था. पण हे पुस्तक आपले सर्व गोड गैरसमज पानोपानी दूर करते. एकूण ३५ प्रकरणे आणि ७५७ पानात विभागलेलं हे पुस्तक आपल्या समोर अमेरिकेच्या युद्धतंत्राचा आणि गुप्तचर दुनियेचा चित्रपट उभा करतं.

११ सप्टेंबर २००१ पूर्वी सी.आय.ए. मधील काही मोजकेच अधिकारी अमेरिकन सरकारला कानीकपाळी ओरडून सांगत होते की कायदा हा अमेरिकेत घुसून मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे आणि त्यासंबंधात मोठी  उचलणे गरजेचं आहे. पण या इशाऱ्याकडे बुश सरकारने साफ दुर्लक्ष केल्यामुळे ज्या क्षणी न्यूयॉर्कच्या टॉवर्स वर विमाने आदळली त्या क्षणापर्यंत अमेरिकन सरकार सुस्त बेसावध बसून होतं. आणि या हल्ल्यांचा, विशेषतः अमेरिकन गुप्तचर संस्थांना याचा जराही सुगावा नं लागल्याचा मानसिक धक्का एवढा प्रचंड होता, की ओसामा बिन लादेनच्या अल कायदाने हा हल्ला घडवून आणलाय याची जाणीव होऊनही अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला प्रत्यक्ष अफगाणिस्तानमध्ये सैनिकी कारवाई सुरु करायला ७ ऑक्टोबर उजाडावा लागला. 

ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय. चे प्रमुख अमेरिकेत होते आणि ओसामाचा आणि तालिबानचा या हल्ल्यांशी काहीही संबंध नाही हे पालुपद त्यांनी त्या क्षणापासून सुरु केलं होतं. पुढे अमेरिकेने जनरल मुशर्रफला सहकार्य करा नाहीतर सर्वनाश होईल अशी थेट धमकी दिल्यानंतर पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर विभागात तालिबान आणि ओसामाला वाऱ्यावर सोडण्यावरून प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. त्या सर्व घटनाक्रमाचं धावतं वर्णन या पुस्तकात खुप चांगल्या पद्धतीने केलं आहे. 

हा हल्ला होण्याआधी उत्तर अफगाणिस्तानच्या पंजशीर खोऱ्यात राहून तालिबान आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध एकहाती लढणारा ताजिक कमांडर "शेर-ए-पंजशीर"  अहमदशाह मसूद आणि त्याचे अमेरिकन संस्थांसोबतचे व्यवहार, प्रत्यक्ष हल्ला होण्याआधी अहमदशाह मसूदची तालिबान- पाकिस्तानने घडवलेली हत्या आणि हत्येनंतर अमेरिकेने कमांडर मसूदच्या "शुमाली इत्तेहाद" म्हणजे "नॉर्दर्न अलायन्स" ला मजबूत करण्यासाठी उचललेली पावलं याचं तपशीलवार वर्णन आहे. ९/११ च्या खूप वर्ष आधी सोव्हिएत रशियाला अफगाणिस्तानमध्ये हरवण्यासाठी, अमेरिकेने ओसामा बिन लादेन आणि हक्कानी नेटवर्कचा जलालुद्दीन हक्कानी यांना अमेरिकेने दिलेली प्रचंड आर्थिक आणि सैनिकी मदत आणि त्याचे उरलेले अवशेष म्हणजेच शिल्लक राहिलेला चिक्कार शस्त्रसाठा परत घेण्यासाठी अमेरिकेने  धडपड आपलं डोकं गरगरवून टाकते. अमेरिकेने अफगाणी "मुजाहिदीन" लंडाकूंना, म्हणजेच हक्कानी नेटवर्कच्या योद्धयांना रशियन वायुसेनेच्या विरोधात वापरण्यासाठी "स्ट्रींजर" हिट सीकिंग मिसाईल्स दिली  मिसाईल्स ९/११ नंतर अमेरिकन वायुसेनेच्या विरोधात वापरली जाऊ लागली. त्यासाठी सी.आय.ए. ने स्ट्रींजर मिसाईलचा "बाय बॅक प्रोग्राम" राबवला. चांगल्या स्थितीत असलेल्या एका स्ट्रींजर मिसाईलसाठी अमेरिकन्स सुरुवातीला २५,००० डॉलर्स देत होते, पुढे पुढे हा धंदा एवढा बोकाळला की किंमत १,५०,००० डॉलर्सवर जाऊन पोचली!

ही मिसाईल्स खांद्यावरून डागली जायची आणि विमानाच्या मागून निघणाऱ्या प्रचंड  आगीचा वेध घेत ती विमानाला टार्गेट करायची. मोठ्या आणि खूप उंचीवरून उडणाऱ्या फायटर जेट्सना याचा तेवढा मोठा धोका नव्हता, पण स्पेशल फोर्सेसना घेऊन जाणारी हेलिकॉप्टर्स आणि मुजाहिदीनच्या इन्फन्ट्री युनिट्सवर आकाशातून आग ओकणारी हेलिकॉप्टर गनशीप्स स्ट्रींजर मिसाईलमुळे बघता बघता खाली कोसळायची. सोव्हिएत रशियाच्या अफगाणिस्तान पराभवात या मिसाईलचा वाटा खूप मोठा होता. 

हे सर्व अमेरिकन उपदव्याप वाचून "तूच घडवीशी तूच फोडीशी" याचा परत परत अनुभव येतो".

७ ऑक्टोबरला अफगाणी जमिनीवर पहिले हवाई हल्ले सुरु झाले तेव्हा सी.आय.ए.च्या टेक्निकल सर्व्हिलन्सने तालिबान प्रमुख मुल्ला ओमर याला सर्व्हिलन्स ड्रोन्सच्या मदतीने अचूकपणे शोधला होता. त्यावेळी सर्व्हिलन्स ड्रोन्स विकसित होत होती आणि प्रत्यक्ष हल्ला करू शकणारी प्रिडेटर ड्रोन्स विकासाच्या पहिल्या टप्प्यात होती. पण मुल्ला ओमरला सतत ४ दिवस आकाशातून बघत असूनही अमेरिकन कमांडर्स त्याच्यावर हल्ला करावा का करू नये या दुविधेत अडकले आणि त्याला ठार मारायचा निर्णय होईपर्यंत तो अलगदपणे पाकिस्तानात पळून गेला. 

तीच कथा ओसामाला मारण्याची! तोरा बोराच्या १४,००० फूट उंच पर्वतरांगात ओसामा लपलेला आहे आणि त्याला मारण्यासाठी ७००० इन्फन्ट्रीची  आहे,  ती लगेच पाठवा अशा फिल्ड कमांडर्स करत असताना आणि २५००० अमेरिकन सैनिक  वेगवेगळ्या तळांवर रिकामे बसून असतानाही असे ७००० सैनिक केवळ "उपलब्ध नाहीत" या सबबीवर तोरा बोराला पाठवले गेले नाहीत. अन्यथा ओसामाला मारायला २०११ उजाडलं नसतं! तोरा बोरावर अमेरिकन वायुसेनेने हजारो किलोचे बॉम्ब टाकूनही ओसामा जिवंत राहिला आणि जमिनीवरील मार्ग बंद करायला पुरेसे सैन्य तैनात नं केल्याने तो सुखाने पाकिस्तानात शिरून मोकळा झाला!

पुढे जेमेतेम २ महिन्यात तालिबानवर तुफान बॉम्बिंग करून त्यांना काबूलच्या बाहेर काढल्यावर, ते आणि अल कायदा हरले आहेत, अशा भ्रमात अमेरिकेने इराकवर हल्ल्याची तयारी सुरु केली आणि अफगाणिस्तानला वाऱ्यावर सोडुन मोकळे झाले. अमेरिकन सैन्यामुळे तालिबान आणि अल कायदाचे जिहादी पाकिस्तानात शिरले, तिथे त्यांनी एक वेगळं जिहादी विश्व तयार केलं आणि आय.एस.आय.ने त्यांचा पुरेपूर वापर अफगाणिस्तानचं नवीन सरकार अस्थिर करण्यासाठी करून घेतला हा इतिहास आहे.  

अमेरिकन सरकारचं अतिशय चुकीचं, विचित्र, अस्थिर आणि तकलादू धोरण, अमेरिकन गुप्तचर विभाग आणि सैन्य यांच्यातील तीव्र मतभेद आणि जमिनीवर प्रत्यक्ष काय स्थिती आहे याची खरी माहिती नं घेता आखलेल्या सैनिकी मोहिमा यामुळे अमेरिकेने स्वतःच्या सैनिकांची आणि अफगाणिस्तान आणि इराकमच्या नागरिकांची केलेली कत्तल, अब्जावधी डॉलर्सचा केलेला चुराडा याचं अतिशय रंजक वर्णन या पुस्तकात आहे.  

एका लेखात या पुस्तकाचं परीक्षण/ विश्लेषण अतिशय अवघड आहे, त्यामुळे मूळ पुस्तक वाचलेलं जास्त बरं! 
आज ९/११ हल्ल्याच्या सतराव्या वार्षिकीच्या संदर्भात आणि अमेरिकेच्या बदलत्या अफगाणिस्तान- पाकिस्तान धोरणाच्या संदर्भात हे पुस्तक आजही संयुक्तिक आहे. 

No comments:


Add to Google