Tuesday, January 15, 2013

खोटं न लिहिण्याचं काय घ्याल ?


नमस्कार,
काल सकाळ मध्ये आलेल्या लेखावर  बऱ्याच प्रतिक्रिया आल्यात.
सकाळ च्या व्यवस्थापनानेही आपल्याकडून आपले या विषयातील म्हणणे मागवले होते.
आपण ते दिले.
डॉ.श्रीरंग गोडबोले यांनी आपले म्हणणे त्यांना पाठवले आहे.
तो मूळ लेख देतो आहे.


               'सकाळ' सारख्या वृत्तपत्रांतून आणि दूरदर्शनच्या अनेक वृत्तवाहिन्यांवर हेमंत देसाई 'तज्ञ' म्हणून नेमाने रतीब घालत असतात.  त्यामुळे असेल कदाचित पण आपण सर्वज्ञ आहोत असा त्यांचा भ्रम झालेला दिसतो. 'इन्स्टण्ट पांडित्या'च्या या जमान्यात माहितीची शहानिशा करून घेण्याची त्यांना गरज वाटत नसावी.   अन्यथा 'न बोलायचं काय घ्याल?' या आपल्या लेखात त्यांनी 
सरसंघचालक श्री.मोहनजी  भागवत यांच्याविषयी मुक्ताफळे उधळली नसती. अकबरुद्दीन ओवैसी, गोपाल कांडा, अनीस उर-रहमान यांच्या पंक्तीत त्यांनी सरसंघचालकांना बसवून ठेवले आहे. मजकुराची लांबी -रुंदी आणि त्यांतील विखार लक्षात घेता सरसंघचालक हेच त्यांचे मुख्य लक्ष्य आहेत हे सहज लक्षात येते.  लेखासोबत सगळ्यांचे सोडून सरसंघचालकांचेच छायाचित्र   शीर्षभागी  देण्यामागे 'सकाळ' ची भूमिकाही संदेहास्पद आहे असे खेदाने म्हणावे लागते. देसाईंचा लेख हा 'सकाळ'च्या परंपरेला काळीमा फासणारा आहे.  
                सरसंघचालकांच्या  दोन विधानांवर प्रसारमाध्यमांनी धुरळा उठवला त्यानंतर सरसंघचालकांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आल्याचे आणि त्याबाबतची वस्तुस्थिती मांडणारे निवेदन संघाकडून प्रसिद्ध करण्यात आले.  सरसंघचालकांचे मूळ भाषण कोणत्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे याची माहितीही देण्यात आली. सरसंघचालकांबाबत धादांत खोटा प्रचार करणार्या. 
प्रसारमाध्यमांनी या खुलाश्याला प्रसिद्धी दिली नाही. त्यामुळे हा दुष्प्रचार जाणीवपूर्वक करण्यात येतोय असा निष्कर्ष काढणे क्रमप्राप्त आहे. सरसंघचालकांचे भाषण कुठे उपलब्ध आहे या आशयाचे पत्र 'सकाळ' ने प्रसिद्ध केले. असे असताना हा खोटेपणा उगाळत बसण्यात देसाई आणि 'सकाळ' यांना काय स्वारस्य आहे? वारंवार खोटे बोलत राहिले की ते खरे वाटू लागते या गोबेल्सच्या  तंत्रावर देसाईंचा दांडगा विश्वास असावा.  त्यांनी  सुतावरून नव्हे तर सुतावाचून 'सेक्युलर' स्वर्ग गाठला आहे.   हे करत असताना त्यांनी जबाबदार पत्रकारितेच्या संकेतांचा भंग केला आहेच पण सरसंघचालकांबाबत अपशब्द वापरून हीन पातळीही  गाठली  आहे. 
                       "बलात्कार 'इंडिया'त होतात, 'भारता'त नव्हे" हे सरसंघचालकांचे विधान घेऊन स्त्रियांवरील अत्याचार सर्वाधिक प्रमाणात ग्रामीण नव्हे तर शहरी भागांत होतात असा त्याचा सोयीस्कर अर्थ देसाईंनी घेतला आहे.  पण सरसंघचालक नेमके काय म्हणाले?   सिल्चर (आसाम) येथे प्रबुद्ध नागरिकांशी झालेल्या वार्तालाप कार्यक्रमात सरसंघचालकांना महिलांवरील अत्याचाराबाबत प्रश्न विचारण्यात आला. 'इंडिया' मध्ये जे घडतंय ते धोकादायक आणि अश्लाघ्य आहे असे सरसंघचालक म्हणाले. परंतु, हे सर्व 'इंडिया'त होतंय, 'भारता'त नव्हे अशी त्यांनी पुस्ती जोडली. तथापि शहरी-ग्रामीण असा भेद त्यांच्या मनात नव्हता हे त्यांच्या नंतरच्या वाक्यांवरून पुरेसे स्पष्ट होते.  जेथे भारताशी नाते तुटले आहे तेथे हे घडते असे ते म्हणाले. आपण मानवता विसरलो, संस्कार विसरलो. या गोष्टी पुस्तकांतून नव्हे तर परंपरेतून येतात, कुटुंबातील शिकवणुकीतून येतात हे त्यांनी स्पष्ट केले. 
                      परंतु,  सरसंघचालक न बोललेले वाक्य बेधडक  त्यांचे म्हणून  खपवण्याचा उपद्व्याप करून देसाई यांनी कहर केला आहे.  नवरा-बायको  यांच्या संबंधांबाबत सरसंघचालकांनी केलेले वक्तव्ये पूर्णपणे  खोट्या प्रकारे प्रस्तुत  करण्यात आली.   इंदोर येथे परमानंद योग थेरपी इस्पितळाच्या उद्घाटन समारंभात सरसंघचालक बोलत होते. साहजिकच त्यांचे भाषण अध्यात्मिक विचार   मांडणारे  होते. त्यांच्या भाषणाच्या संबंधित भागाचा  सारांश  पुढील प्रमाणे– “गेल्या ३०० वर्षात मनुष्य आपल्याच अहंकारात गुरफटून विचार करू लागला आहे. जे मी म्हणतो तेच सत्य. त्याचा अहंकार एवढा वाढला आहे की, परमेश्वर असेल तर  त्याला माझ्या टेस्ट ट्यूब मध्ये सिद्ध करून दाखवावे लागेल, असे म्हणू लागला. 
अशात, तो विचार करू लागला की हे विश्व काय आहे? आत्मा परमात्मा या बेकार    गोष्टी आहेत. सर्व काही जडाचा खेळ आहे… या सृष्टीत कोणाचा कोणाशी संबंध नाही.    लाखो  वर्षांपासून चालणारे हे जग संबंधांवर नाही तर स्वार्थावर चालते आहे. तो एक सौदा  आहे. पत्नीशी पतीचा सौदा झाला आहे .तुम्ही त्याला (आपल्या येथे) विवाह     संस्कार म्हणत असाल, परंतु तो (पाश्चात्यांसाठी) सौदा आहे. तू माझे घर  सांभाळ,   मला सुख दे, मी तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करतो आणि तुला सुरक्षित ठेवतो. जोपर्यंत पत्नी ठीक आहे तोपर्यंत पती करार रूपाने तिला ठेवतो.   जर तिने करार पूर्ण    केला नाही तर तिला सोडून देतो.   काही कारणाने जर पतीने करार पूर्ण केला नाही तर त्याला सोडा व दुसरा करार शोधणारा शोधा".  हा सगळा पाश्चात्य दृष्टीकोन सरसंघचालक मांडत होते आणि त्याचा फोलपणा सांगत होते. परंतु, ज्या विचाराचा  ते धिक्कार करत होते ते विचार त्यांचेच आहेत असा खोटा प्रचार सुरू झाला. त्यानंतर ते काय बोलले त्याचे प्रसारमाध्यमांना सोयरसुतक नव्हतेच!  त्यांच्या भाषणातील   पुढील भाग असा, " या बाबतीत भारतीय विचार काय म्हणतात. ते म्हणतात, जग हे संबंधांवर आधारित आहे. वेगवेगळे दिसत असले तरी सगळे एक आहेत. असे म्हणा की एकच अनेक रुपात प्रकट झाला आहे. त्या दृष्टीने सगळे एकमेकांपासून वेगळे आहेत. विश्वात कुठेही घडणारी अर्थहीन घटनाही साऱ्या विश्वाच्या व्यापारावर काही ना काही परिणाम करत असते. चांगल्या गोष्टी घडल्या तर चांगले परिणाम होतील. अन्यथा नाही. कोणाचा विनाश होत असेल तर तो तुमचाही विनाश आहे. तुम्ही त्याच्याशी जोडलेले आहात. तुम्ही मनुष्य आहात कोणी सृष्टीच्या बाहेरील नाही. "   अध्यात्माधारित भारतीय विचार जोडणारा आहे हे त्यांचे प्रतिपादनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. 
                      'इलेक्ट्रोनिक मीडिया' मुळे काही राजकारणी मंडळींना चळ लागला आहे असे देसाई म्हणतात.  ते काहीही असले तरी ‘मिडीया’ ला आलेल्या अवास्तव महत्त्वामुळे देसाई यांच्यासारख्या पत्रपंडितांना मात्र सुगीचे दिवस आले आहेत हे निश्चित. 

 'सकाळ' ने हा खुलासा छापावा ही विनंती.  आमच्या भावना दुखावल्या म्हणून नव्हे तर खोटा मजकूर प्रसृत केला म्हणून.

डॉ. श्रीरंग अरविंद गोडबोले   

Add to Google