Saturday, September 8, 2018

ट्रंप विरुद्ध बंड भडकावण्यात मग्न अमेरिकन मिडीया आणि लिबरल्स!


Image may contain: 2 people, including Kakoli Ghoshal, text

----- विनय जोशी 


न्यूयॉर्क टाईम्सच्या अग्रलेखाशेजारी छापलेल्या एका ट्रंप विरोधी निनावी लेखाने अमेरिकन राजकारणात  अभूतपूर्व वादळ!

डोनाल्ड ट्रंपचे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होणे अजुनही अमेरिकन मिडीया आणि लिबरल्सच्या पचनी पडताना दिसत नाही. राष्ट्राध्यक्षाची वेगळी कार्यपद्धती या मंडळींचे "व्हेस्टेड इंटरेस्ट" दुखावत आहेत. अमेरिकन मिडीयाला जाहीरपणे "फेक न्यूज" चे कारखाने, बदमाश, मतलबी वगैरे शेलक्या विशेषणांनी संबोधणारे ट्रंप आणि मिडीया यांच्यात पराकोटीची कटुता आहे. आता अशा प्रकारचे थेट ट्रंप विरोधी अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राष्ट्राध्यक्षांची मनस्थिती आणि मानसिकता देशासाठी अतिशय घातक आहे, प्रशासनातील अनेक उच्चस्तरीय अधिकारी राष्ट्राध्यक्षांच्या विरोधात एकत्र येऊन काम करत आहेत आणि त्यांच्या निर्णयांना विरोध करत आहेत आणि मीही त्यापैकी एक आहे असंही त्या लेखकाने म्हटलं आहे. 

अपेक्षेप्रमाणे ट्रंम्पनी या लेखकाला "घाबरट" माणूस म्हणून त्यावर ट्विटर वरून प्रचंड टीका केली आहे. व्हाईट हाऊसची प्रवक्ती साराह सँडर्सने त्या लेखकाला "कॉवर्ड" म्हटलं आहे आणि स्वतःचा अहंकार जपणाऱ्या या माणसाने तात्काळ लेखाची जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी केली आहे. 

ट्रंम्पवर अमेरिकन घटनेच्या २५ व्या दुरुस्तीची टांगती तलवार?

अमेरिकन घटनेमध्ये २५ व्या दुरुस्तीअंतर्गत एक तरतूद आहे, त्यात जर मंत्रिमंडळातील बहुसंख्य मंत्री आणि उपराष्ट्रपती यांना राष्ट्राध्यक्षाच्या शारीरिक किंवा  मानसिक किंवा दोन्ही प्रकारच्या तंदुरुस्तीबद्दल शंका निर्माण झाली आणि राष्ट्राध्यक्ष म्हणजेच अमेरिकन सेनादलांचा कमांडर-इन-चीफ देश चालवण्यास अक्षम आहे अशी खात्री पटली तर उपराष्ट्रपतीच्या ताब्यात देशाची सूत्रे दिली जाऊ शकतात. याचा अर्थ राष्ट्रपतीची उचलबांगडी केली जाऊ शकते. सदर निनावी लेखकाने घटनेची २५ वी दुरुस्ती ट्रंम्प विरोधात वापरण्याची हालचाल सुरु असल्याची माहिती दिली आहे. 

ट्रंम्प कुणाला नको आहे?

भारतात जशी "ल्यूटन्स दिल्ली" सत्ताधारी वर्तुळात प्रचंड शक्तिशाली आहे तशीच अमेरिकेत एक मोठी लॉबी राजकारणात सक्रीय आहे. ट्रंम्पचा राजकारणाशी काडीमात्र संबंध नव्हता आणि अचानक व्यावसायिक पार्श्वभूमीचा माणूस देशाचा राष्ट्रपती झाला ही बाब अनेक प्रस्थापित लोकांच्या पचनी पडत नाही. त्यात अमेरिकन मिडीया, उद्योगपती, लॉबिस्ट, विचारवंत आणि अन्य अनेक जण आहेत. पण अमेरिकन विदेशनीती आणि व्यापाराच्या बाबतीत ट्रंम्पचे अनेक निर्णय हे ऐतिहासिक आणि अमेरिकन लोकांसाठी फायदेशीर होते. त्यामुळे व्यापारी राष्ट्रपती काहीच दिवसात हार मानेल आणि परत अप्रत्यक्षपणे सत्ता आपल्या हाती येईल हा या प्रस्थापित लोकांचा भ्रम कायमचा फुटला. त्यामुळे काही असंतुष्ट लोकांना हाताशी धरून कोणत्याही स्थितीत ट्रंम्पला ४ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू द्यायचा नाही असा चंग या लोकांनी बांधला आहे. 

ट्रंम्पच्या चीनसोबतच्या व्यापार युद्धाची गोड फळे.. 

अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारात अमेरिका जेव्हा १ डॉलरची निर्यात चीनला करतो तेव्हा चीनकडून ६ डॉलरचा माल आयात करतो. एवढी मोठी तफावत भरून काढण्यासाठी एकही अमेरिकन नेत्याने आजपर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलले नव्हते, ती हिम्मत ट्रंम्पने दाखवून चीनच्या अमेरिकन निर्यातीचे कंबरडे पार मोडले आहे. अनेक वर्षे चीनच्या स्वस्त स्टीलमुळे बंद पडलेल्या अमेरिकन स्टील फॅक्टरीज एका रात्रीत परत सुरु झाल्या आहेत. चीनकडून येणाऱ्या मालावर प्रचंड कर लादल्यामुळे अमेरिकन मालाला अचानक मोठा उठाव सुरु झाला आहे. साहजिकच सामान्य जनता दिवसेंदिवस जास्त संख्येने ट्रंम्पच्या मागे उभी राहताना दिसत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर अमेरीकन लिबरल्स आणि मिडीया यांची विश्वासार्हता पार धुळीला मिळेल. या भीतीनेच हे निनावी लेखाचे कारस्थान रचण्यात आले आहे. 

उत्तर कोरियाचा सुटत चाललेला तिढा... 

ट्रंम्पने सत्तेवर येताच उत्तर कोरियावर प्रचंड सैनिकी दबाव वाढवून युद्धाची मोठी तयारी सुरु केली आणि अचानक दक्षिण कोरियन राष्ट्रपतीला मध्ये घालून उत्तरेच्या किम जोंगला चर्चेचे निमंत्रण देऊन ट्रंम्प मोकळे झाले. नंतर दोघांत चर्चा झाली आणि काल झालेल्या घोषणेप्रमाणे ट्रंम्पचा पहिला कार्यकाळ संपण्याआधी उत्तर कोरिया आण्विक शस्त्रे नष्ट करण्याची सुरुवात करेल अशी किम जोंगने घोषणा केली आहे. या भानगडीत उत्तर कोरिया चीनच्या प्रभावक्षेत्रातुन कायमचा बाहेर पडुन तो अमेरिकेच्या गटात जाईल अशा रास्त भीतीने चीनची झोप उडाली आहे. 

पाकिस्तान सुद्धा अमेरिकन नेत्यांना मूर्ख बनवून अनेक वर्षे इस्लामी आतंकवादाला अफगाणिस्तानात खतपाणी घालत आला आहे. ट्रंम्पनी त्यावर जालीम उपाय म्हणून पाकिस्तानची सैनिकी मदत एका झटक्यात बंद करून पाकिस्तानची मोठी अडचण करून ठेवली आहे. अमेरिकन प्रशासन वर्षानुवर्षे "पाकिस्तान" प्रेमी आणि भारताचा द्वेष करणारं राहिलेलं आहे, ट्रंम्प सरळ सरळ भारताची भाषा बोलत असून, पाकिस्तानला पूर्ण उघडा पाडत आहे, त्यामुळे तेथील "पाकिस्तान लॉबी" सुद्धा त्यांच्या विरोधात कंबर कसत आहे. 

ट्रंम्पकडून सीआयए च्या शक्तीत मोठी कपात

अमेरिकन विदेश नितीमध्ये सीआयएची मोठी भूमिका नेहमीच राहिलेली आहे. पण त्यामुळे तिच्यात प्रचंड हेकेखोरपणा आणि भ्रष्टाचार बोकाळला होता. ट्रंम्प सत्तेवर येताच त्यांनी सीआयए च्या शक्तीमध्ये कपात करून तिच्या  प्रमुखाला असलेले अनेक विशेषाधिकार काढून घेतले. साहजिकच त्यांच्यात अस्वस्थता असणं स्वाभाविक आहे. आणि सीआयए ची उपदव्यापांची क्षमता अफाट आहे. त्याची चव  ती ट्रंम्पला येणाऱ्या काही महिन्यात दाखवेलच!     

ट्रंम्पसाठी येणारे काही महिने अतिशय आव्हानात्मक असतील, कारण रशियासोबत हातमिळवणी करून हिलरीच्या प्रचाराची ऐशीतैशी करण्याच्या आरोपातून ते मुक्त होण्याच्या मार्गावर असताना घटनेच्या २५ व्या दुरुस्तीचं हत्यार अमेरिकन "अस्वस्थ आत्मे" उपसण्याचा मार्गावर आहेत. पण चीनला जेमतेम ६ महिन्यात पाणी पाजून अमेरिकन अर्थव्यववस्थेत पुन्हा "चमक" आणण्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. त्यामुळे मिडीया आणि लिबरल्सनी कितीही आकांडतांडव केलं तरी "जनता" त्यांना साथ देण्याची चिन्हे आहेत... 

भारतात सुद्धा बोंबाबोंब करणारे लोक अमेरिका मिडीया आणि लिबरल्सच्या गटात मोडत आहेत का?


Image may contain: text


Add to Google