Thursday, August 23, 2018

सनातन आणि संघ संबंध- कोण चुक,कोण बरोबर?

सनातन आणि संघ संबंध- कोण चुक,कोण बरोबर?

---- विनय जोशी
काही दिवसांपुर्वी प्रकाशित झालेल्या "सनातनवर कॉंग्रेसला बंदी का नको होती? शिवसेना-वसंतसेना भाग-२ चा कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा फसलेला प्रयोग!" या लेखावर सनातनच्या एका साधकाने मुंबई तरुण भारतला एक लंबे चौडे पत्र लिहुन हिंदु संघटनांनी मतभेद विसरून एकत्र काम का आणि कसे केले पाहिजे याचे उपदेश दिले. लेखाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! पण या लेखाचा प्रतिवाद केल्यामुळे सनातनच्या टोकाच्या संघद्वेषाकडे दुर्लक्ष नक्कीच करता येणार नाही. त्यामुळे संघाने सनातन सोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर सनातनने कसा प्रतिसाद दिला याची चर्चा होणे आवश्यक आहे.
संघाचा सनातन सोबत संपर्काचा प्रयत्न....
सन २०००- २००१ च्या आसपास सनातन अतिशय वेगाने वाढत होती. सनातनचा सगळा प्रचार हिंदु हित आणि हिंदु संघटन याच्या अवतीभोवती फिरत होता. अर्ध्या बाह्यांचे पिवळे अॅप्रन घातलेले साधक गोव्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी अत्यंत मनःपुर्वक सनातनची प्रचार सामग्री वाटत फिरायचे. सुरुवातीच्या काळात "उदबत्ती देवतेने मार्गदर्शन करणे", "प.पु. आठवले गुरुजींनी वापरलेल्या कमोड मधील पाणी गंगाजलासमान पवित्र मानुन ते प्राशन करणे", "आध्यात्मिकतेची पातळी ३०% वरून ९५% होणे" वगैरे आचरट प्रकार सनातनने सुरु केले नव्हते किंवा निदान तसे छापले जात नव्हते.
सनातनची चर्चा संघ स्वयंसेवकांमध्ये जोरात होती. आणि या नवीन संघटनेत नेमके कोण लोक आहेत, त्यांचा नक्की उद्देश काय आहे हे जाणुन घेण्यासाठी मुंबईमधील एक अत्यंत वरिष्ठ आणि अनुभवी संघप्रचारकांनी त्यांच्या एका सहकारी प्रचारकाला सनातनच्या नेतृत्वाची भेट घ्यायला सांगितली. त्यानुसार ते संघ प्रचारक सनातनच्या पनवेल आश्रमात गेले. त्यांच्या आश्रमातील साधकांसोबत गप्पा झाल्या. पण काहीतरी गडबड लक्षात आल्यामुळे त्या संघप्रचारकांनी तिथे असलेल्या पत्र संपादकाला बोलता बोलता असं सांगितलं, की ही भेट अनौपचारिक आहे आणि यासंदर्भात एवढ्यात काहीही नं छापलेलं बरं. त्यावर त्या संपादक महोदयांनी सांगितलं, "गुरुजींची शिकवण आहे, सत्य लपवू नये!"
दुसऱ्याच दिवशी सनातनच्या अंकात संघप्रचारकांच्या आश्रम भेतीवरील साद्यंत वृत्तांत सनातनने छापला! "या भेटीसंदर्भात काहीही छापु नये, अशी विनंती त्यांनी केली यासह छापला!" आणि वर एक बलाढ्य हिंदु संघटना सनातनच्या दारात, अशी शेखी सुद्धा मिरवली!
अशा लोकांच्या वाटेस जाईल कोणी परत?
नंतर सनातनवर बंदी घालणं वगैरे मागण्या उठु लागल्यावर सनातनचे डोळे खाडकन उघडले आणि दिल्लीमधील संघप्रचारकांना भेटण्यासाठी सनातनचे दूत दिल्लीला गेले, पण आधी एका अनौपचारिक भेटीचा सनातनने जो काही राडा केला होता तो अनुभव लक्षात घेऊन संघाने त्यांच्याकडे साफ साफ दुर्लक्ष केलं.
पुढे सनातनला संघासंबंधात एक अतिशय गुप्त (???) आणि संवेदनशील(????) माहिती हाती लागली. ती बातमी अशी की संघ नेतृत्वाने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय.एस.आय. कडून काही कोटी रुपये घेतले! सत्यावर अढळ विश्वास असल्याने सनातनने ही बातमी मीठ मसाला लाऊन त्यांच्या अंकात छापली! यामुळे संघकार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला. अशाप्रकारे सनातनने भविष्यात संघाजवळ चांगले संबंध निर्माण करण्याचे दरवाजे पूर्णपणे बंद करून टाकले.
इथून पुढे सनातनच्या पेपरात आणि सर्व लिखाणात पराकोटीचा संघद्वेष उफाळून येऊ लागला. हिंदू हित आणि राष्ट्रीयता या संदर्भात पहिल्या पानावर बातमी छापायची आणि त्याला कंसात तळटीप देऊन, संघाचे बेगडी हिंदुत्व अजुन किती काळ हिंदुंची फसवणुक करणार? वगैरे ज्ञानामृत पाजणारा मजकूर लिहायचा, ही सनातनची सवय बनुन गेली.
नंतर हिंदुविरोधी लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या लोकांच्या फोटोंवर सनातनच्या वेबसाईटवर लाल रंगाच्या फुल्या मारण्याचे उपद्व्याप सुरु झाले. मग सुतली बॉम्बस्फोट वगैरे वगैरे सगळे प्रकार सुरु झाले. आणि त्यात अडकलेल्या लोकांना सोडवण्यासाठी संघाने पुढे यावं अशी अपेक्षा सनातन पेपरमधून व्यक्त करू लागला. ज्या संघाला उठता बसता सनातनने दोष दिला, वाट्टेल ते गरळ ओकलं आणि शिवाय आतंकवादाचे थेट समर्थन केलं त्यांच्यासाठी संघाने स्वतःची प्रतिष्ठा पणाला का लावावी? संघालाही मालेगाव स्फोटात अडकवण्याचा प्रयत्न झालाच पण त्यात जंगजंग पछाडून कॉंग्रेस काहीही करू शकली नाही. सनातनने आपली विश्वासार्हता पुर्णपणे गमावलेली असल्याने डोकं शाबूत असलेले आणि हिंदु हिताची खरी तळमळ असलेले लोकसुद्धा त्यांच्यापासुन दुरावले. तर संघ कुठली साथ देणार?
सनातन संघावर टीका का करतो?
ज्या व्यक्तीची जागा दुसऱ्या व्यक्तीला घायची असते तिच्यावर टीका केली जाते असा नियम आहे. उदाहरणार्थ; राहुल गांधी रोज नं चुकता मोदींवर टीका करतात, का? ते जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांच्यावर टीका का करत नाहीत? तर गांधींना मोदी सध्या ज्या खुर्चीवर बसले आहेत ती खुर्ची हवी आहे, म्हणून त्यांच्यावर टीका, शिंझो आबेवर टीका करून त्यांना दिल्लीची खुर्ची कशी मिळणार? तसंच सनातनला संघाचा "बलाढ्य हिंदु संघटन" हा मान मिळवायचा आहे, त्यामुळे संघ हिंदु हितासाठी काहीही करत नाही हे सिद्ध करणे सनातनच्या वाढीसाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे मिळेल त्या मुद्द्याला आधार मानुन सनातन हे काम करत असते.
सनातनचा दावा असा आहे, सावरकर आणि गोळवलकर यांच्यातही मतभेद होते आणि हिंदु हितासाठी काम करणाऱ्या संघटनांत मतभेद आहेत त्यामुळे प्रामाणिक टीका होऊ शकते. मी हा तर्क कचऱ्याच्या टोपलीत टाकतो. सावरकर आणि गोळवलकर यांच्यातील मतभेदांची सनातन संघ मतभेदाशी तुलनाच होऊ शकत नाही. ह्या दोन व्यक्ती अतिशय उच्च दर्जाच्या आणि बुद्धिमान होत्या. सनातन आणि संघात उत्तर-दक्षिण ध्रुवाएवढं अंतर आहे. सनातनचा "प्रामाणिक टीकेचा" तर्क अतिशय दिशाभूल करणारा आहे, संघ प्रमुखांवर वैयक्तिक आणि खालच्या पातळीवर जाऊन केलेली टीका याला सनातन प्रामाणिक टीका म्हणणार का?
संघ प्रमुखांवर सनातनने केलेले धादांत असत्य आरोप हे त्यांनी केलेला "सुपारी किलिंग" चा प्रकार होता आणि महाराष्ट्रातील संघ विरोधी राजकीय पक्षांचा त्याला सक्रीय पाठींबा होता.
उत्तरात सनातनने विचारले आहे, "संघ-सनातन वेगळे आहेत हे दाखवण्याची घाई कसली?" यावर एवढंच म्हणू शकतो की हे वेगळेपण दाखवण्याची संघाला गरज नाही कारण ते सनातनची प्रकाशानेच नित्य नियमाने दाखवत असतात. "काळी जादू काढण्यासाठी पायाच्या नखापासून कपाळापर्यंत गंध आणि स्टीकर लावणे", "स्वप्नात अनेक गुंडांनी घेरल्यावर, जप सुरु केल्यावर त्या गुंडांचा स्फोट होणे", "सात्विकतेची पातळी जपानंतर एका दिवसात ४५% वरून ९०% वर जाणे" आणि इथे लिहिता नं येणारे असंख्य प्रकार हेच सनातन संघापेक्षा वेगळा आहे हे सिद्ध करत असतात...
सनातनने समाधानासाठी स्वतःला संघापेक्षा उच्च पातळीचं मानावं, त्याने संघाला काय फरक पडतो? पण "प्रामाणिक मतभेद" वगैरे नाटकी भाषा वापरू नये कारण सनातन संघाचा द्वेष करते आणि संघाला प्रतिस्पर्धी मानते यात तिळमात्र शंका नाही! त्यामुळे सनातनवर टीका करणाऱ्यांना "निधर्मी" लोकांच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न हास्यास्पद आहे.
सनातन आणि संघ यांची सिद्धांत,रचना, धोरणं, प्राथमिक बैठक, कार्यपद्धती आणि विचार यात जमीन आसमानाचा फरक आहे.
सनातनचे साधक बनुन घरदार सोडुन आश्रमात जाऊन राहणाऱ्या अनेकांच्या प्रॉपर्टी गायब झाल्या आहेत. असं एकही उदाहरण नाही हे म्हणण्याची हिम्मत सनातनमध्ये आहे? तिथे उच्च प्रतीचे "Psychological Manipulation" आणि लोक भ्रमिष्ट झाल्यासारखे बरळतात, असं आम्ही नाही साधकांचे नातेवाईक म्हणतात.
तेव्हा तत्कालीन आकर्षक विषयांना धरून स्वतः आंदोलन करून संघ ते करत नाही म्हणून संघाला आरोपीच्या उभं करायचं हे धंदे सनातन जेवढ्या लवकर बंद करेल तेवढं लवकर त्याचं भलं होईल...



Add to Google