Wednesday, August 29, 2018

ज्ञान प्रबोधिनी- संघ परस्पर संबंध, सनातनच्या पार्श्वभूमीवर

ज्ञान प्रबोधिनी- संघ परस्पर संबंध, सनातनच्या पार्श्वभूमीवर
--- विनय जोशी 

स्वातंत्र्याच्या नंतर लगेचंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दोन उमदे, बुद्धिमान प्रचारक श्री. आप्पासाहेब पेंडसे आणि श्री. मधुकरराव देवल संघाची वाट सोडुन वेगळ्या वाटेवर निघाले. तत्कालीन संघप्रमुख श्री. गोळवलकर गुरुजी यांच्याशी त्यांचे संघाची कार्यपद्धती आणि समाजसेवा यासंदर्भात सैद्धांतिक मतभेद होते असं म्हणायला भरपूर जागा आहे.

पुढे श्री.आप्पासाहेब पेंडसे यांनी पुण्याला ज्ञान प्रबोधिनी या संस्थेची स्थापना केली आणि श्री. मधुकरराव देवल सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या आपल्या मूळ गावी जाऊन 'एकात्म समाज केंद्रा’ च्या माध्यमातुन दलित समाजाच्या उत्थानाचे काम करू लागले.

बघता बघता ज्ञान प्रबोधिनीने महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला. वेगवेगळे अभिनव उपक्रम, शाळा, कौशल्य विकास आणि थोडक्यात म्हणजे विद्यार्थ्यांना जन्मभर पुरतील असे संस्कार देणारी एक सक्षम व्यवस्था निर्माण केली. अत्यंत सकारात्मक विचार करणारी, एकसो एक विद्वान, बुद्धिमान, ध्येयनिष्ठ हजारो- लाखो माणसे प्रबोधिनीने समाजात शब्दशः ओतली. महाराष्ट्रात सध्या आलेल्या स्पर्धा परीक्षांच्या लाटेमध्ये प्रबोधिनीची भुमिका महत्वाची आहे. सध्याही तिथे या संदर्भातील उपक्रम चालत असतात.

एकंच काम डोळ्यासमोर ठेऊन, जन्मभर त्यात स्वतःला झोकुन देऊन त्या कामात सर्वोत्कृष्ठ कामगिरी करणारे अनेक जण यातुन बाहेर पडले आहेत. आपण केलेल्या कामाचा अजिबात गवगवा, मार्केटिंग, श्रेयवाद नं लाटता, सतत ठरलेल्या वाटेवर चालणारे लोक प्रबोधिनीने समाजाला दिले आहेत. त्यांनी केलेली कामे सर्वोच्च दर्जाचीच असणार आणि त्या त्या क्षेत्रात ती सर्वात उंचावरच असणार याबाबत प्रबोधिनीच्या बाहेरील लोकांनाही पुर्ण खात्री आहे, हेच प्रबोधिनीचं सगळ्यात मोठं यश आहे.

प्रबोधिनीने उपलब्ध कार्यकर्ते आणि संसाधने यांची योग्य सांगड घालुन कामे उभी केली आहेत. अंथरूण पाहुन पाय पसरल्यामुळे अनियंत्रित, असंबंध फाफट पसारा त्यांनी वाढवला नाही आणि त्याच्या दर्जाशी जराही तडजोड केली नाही. संघातुन बाहेर पडलेले आप्पासाहेब यांनी स्थापन केलेली असली तरी त्यांनी स्वतः संघाचा कधीही द्वेष केला नाही, त्यामुळेच तो प्रबोधिनीच्या मानसिकतेत कुणालाही शिवला नाही. त्याशिवाय संघाजवळ स्पर्धा करण्याची ईर्षा त्यांच्या मनाला शिवली नाही, त्यामुळे त्यांच्या मनात समाजसेवा म्हणुन जो काही विचार होता, तो त्यांनी अपार कष्ट करून जमिनीवर आणला आणि संघ ज्या क्षेत्रात काम करत नव्हता त्यात त्यांनी मुसंडी मारून एक "बेंचमार्क" तयार केला.

ज्यातुन ते बाहेर पडले त्या संघाशी काही ना काही मतभेद असणं स्वाभाविक आहे पण ते कधीही कटुतेमध्ये परिवर्तीत झाले नाहीत. संघ "क्वान्टीटी" च्या मागे लागुन "क्वालिटी" मध्ये तडजोड करतो असा प्रबोधीनितल्या बऱ्याच जणांचा आक्षेप आहे (ह्याला सकारात्मक टीका म्हणतात). काही अंशी तो बरोबरही असू शकतो.

आपण कोणीतरी आहोत हे दाखवण्यासाठी दुसरा वाईट आहे, हे दाखवण्याची प्रबोधिनीला कधीही गरज भासली नाही.

दुसरे श्री. मधुकरराव देवल, जे आप्पासाहेब पेंडसे यांच्यासारखेच संघ प्रचारक होते. त्यांनी आपल्या म्हैसाळ या मूळ गावी जाऊन दलित समाजाच्या विकासासाठी प्रचंड धडपड करून दलित बांधवांचा मोठा विश्वास मिळवला. 'एकात्म समाज केंद्रा’ या नावाने सुरु केलेल्या या कामाने त्यांनी जादु घडवली. त्यांच्या कार्यावर वसंत देशपांडे यांनी १९८४ साली 'म्हैसाळ : दलितमुक्तीचा एक प्रयोग'. हे पुस्तक लिहिलं. त्याला नाटककार विजय तेंडुलकर (हातात पिस्तुल मिळालं तर पहिली गोळी मोदीला मारीन म्हणणारे ते हेच!!!) यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात देवलांच्या कामाचा आणि त्यांच्या कामामुळे दलित समाजाच्या वाढलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक स्तराचा विस्तृत अहवाल दिला आहे. देवलांनी स्थापन केलेली "श्रीविठ्ठल सहकारी शेती सोसायटी" ही खरोखर दलितांनी-दलितांसाठी चालवलेली संस्था आहे आणि या संस्थेने गावकऱ्यांचा आर्थिक उद्धार झाला. देवलांच्या कामाची पु.ल. देशपांडे यांनीही खूप स्तुती केली आहे.

अशा, म्हणजे संघापासून फारकत घेऊन काम करणाऱ्या मधुकरराव देवल यांच्याशी संघ कसा वागला? संघाचे तिसरे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना पुढे लोकमान्य टिळक पुरस्कार मिळाला. बाळासाहेबांनी पुरस्काराची सर्व रक्कम श्री. मधुकरराव देवलांच्या म्हैसाळ प्रकल्पाला देऊन टाकली. कोत्या मनोवृत्तीची संघटना अशी वागेल?

ज्ञान प्रबोधिनी आसामच्या आसपास अनेक शैक्षणिक प्रयोग करत असते. स्थानिक संघ प्रचारक जेव्हा आणि जशी गरज पडेल तेव्हा आणि तशी मदत त्यांच्या कामात करत असतात. प्रबोधिनीच्या कामाचा संघाच्या कामाला अप्रत्यक्ष उपयोग होतंच असतो. पण संघ आणि प्रबोधिनी यांना कोणत्याही प्रकारची स्पर्धा एकमेकांशी करण्यात रस नसल्याने ज्याला, जिथे, जेव्हा मदत लागेल तेव्हा तो ती मागतो आणि दुसरा निसंकोचपणे ती देतो.

प्रबोधिनी अत्यंत सकारात्मक विचार रुजवण्याच्या नादात स्वप्नाळु, समाजात चालणाऱ्या वास्तविक व्यवहारांच्या बाबतीत पुर्णपणे अनभिज्ञ पिढी घडवते असा काही संघवाले आक्षेप घेतात (सकारात्मक टीका अशी केली जाते!!!). पण हा आक्षेप आत्यंतिक विषारी दिशेने कधीही जात नाही.

निष्कर्ष:-
संघ सैद्धांतिक मतभेद सैद्धांतिक पातळीवरून हाताळतो (समोर परिपक्व लोक असतील तर!!!), त्याला विरोधासाठी विरोध आणि विषारी अपप्रचाराच्या पातळीवर जाऊ देत नाही, कारण असले धंदे करायला कुणालाच रिकामा वेळ नसतो.

मागील तीन लेखात "सनातन" संघाविरोधात सोंगटी म्हणुन कशी वापरली गेली आणि 'सकारात्मक टीका' अशा गोड लेबलखाली सनातनच्या प्रकाशनांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांवर किती गलिच्छ आणि खोटेनाटे आरोप केले त्याचा आढावा आपण घेतला. २००६ ला श्री. गुरुजी जन्मशताब्दी निमित्त संघाने देशभर हिंदु संमेलने घेतली त्यांनतर सनातनने तशीच हिंदु संमेलने गावोगाव घेतली (याबद्दल सनातनचे आभार). आणि नंतर कोणीतरी अज्ञातपणे चावी फिरवल्यावर सनातनचा संघाविरोधात अतिशय विषारी, द्वेषपूर्ण प्रचार सुरु झाला.

संघविरोधी घाणेरड्या प्रचारानंतर लोकांनी तिखट प्रतिक्रिया दिली की "सकारात्मक टीकेची" ढाल वापरायची आणि प्रत्यक्षात चारित्र्यहनन करायचं ही सनातनची जुनी सवय आहे. ती यापुढे कायमची बंद होईल अशी आशा आहे!

मागील तीन आणि हा चौथा लेख यानंतर "सनातन" ला "सकारात्मक टिके" चा अर्थ कळला असेल अशी अपेक्षा बाळगुया आणि नवीन लेख लिहायची गरज भासणार नाही अशीही खात्री ठेवुया!



No comments:


Add to Google